अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण १३११ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १९४ ग्रुप ग्रामपंचायती आहेत. तसेच स्वतंत्र १११५ ग्रामपंचायती आहेत.
ग्रामपंचायत विभागाचे विभाग प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) हे कामकाज पहातात.
ग्रामपंचायत पातळीवरील पाणीपट्टी, घरपट्टी वसूली क्षेत्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांकडून केली जाते. ग्रामपंचायत ही स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था असून त्याचे पर्यवेक्षण व संनियंत्रण ग्रामपंचायत विभागामार्फत केले जाते. ग्रामपंचायतींना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी व उत्पन्न वाढीसाठी जिल्हा ग्राम विकास निधीमधून कर्ज दिले जाते. केंद्रशासन / राज्य शासन / जिल्हा परिषद सेस या निधीतून मंजूर कामे / योजना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपातळीवर राबविल्या जातात.
ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे आस्थापनाविषयक सर्व बाबी, नियुक्त्या, पदोन्नत्या, बदल्या, पुरस्कार, वेतनवाढी, आदर्श ग्रामसेवक सत्कार, शिस्तभंगविषयक कार्यवाही इ. प्रशासकीय कामे या विभागामार्फत केले जातात.
१२ वा वित्त आयोग, यशवंत ग्राम समृद्धी योजना, तिर्थक्षेत्र विकास योजना, मंजूर कामांना पंयात समितीमार्फत ग्रामपंचायतींना अनुदान वाटप केले जाते..
निर्मल ग्राम पुरस्कार योजना- सन २००२-०३ पासून जिल्ह्यामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व कुटूंबांनी शौचालयाचा वापर करणे, घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे, परिसर स्वच्छता शाळा व अंगणवाडीमध्ये स्वच्छतागृहांची सुविधा निर्माण करणे आदी बाबींचा समावेश होतो.
उपरोक्त बाबींचा काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना केंद्र शासनाकडून निर्मल ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आज अखेर जिल्ह्यातील १२४ ग्रामपंचायतींना निर्मला ग्राम पुरस्कार प्राप्त झाला.